Latest NewsNagpur

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना कायदे निर्मितीची प्रक्रिया, संसदीय पद्धत अभ्यासण्याची संधी प्राप्त होते. अशा प्रशिक्षण प्रबोधनातूनच लोकशाही समृद्ध होते. त्यामुळे प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन हे समृद्ध लोकशाहीची त्रिसुत्री आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विधानपरिषदेने संमत केलेले महत्त्वपूर्ण विधेयके ठराव आणि धोरणे याविषयी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या संदर्भ समृद्ध ग्रंथ मालिकेतील द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज विधानपरिषद सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाले.

यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ज्या सभागृहाने १८ वर्ष शिकवीत अनुभवसंपन्न केले आणि देशाची सेवा करण्याची संधी दिली, अशा सभागृहात कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा येण्याचे भाग्य मिळाले. त्यामुळे या सभागृहातील आठवणींना उजाळा मिळाला. चर्चेद्वारे समोरच्याकडून राज्याच्या विकासासाठी हवे असलेले काढून घेण्याचे कौशल्य याच सभागृहाने दिले. विधानपरिषद सभागृहात कायदा निर्मितीवर झालेल्या चर्चेतून परिणामकारक कायद्यांची निर्मिती झाली आहे. या सभागृहात राज्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना नियमांची लढाई झाली तरी कधी वैयक्तिक संबंधांमध्ये कटूता आली नाही, हीच आपल्या लोकशाहीची समृद्ध परंपरा आहे.

लोकशाहीमध्ये संविधानाने अधिकार व कर्तव्य निश्चित केले आहेत. विकासाची समान संधी यातून निर्माण झाली आहे. लोकशाहीच्या श्रेष्ठ परंपरांचे पालन विधिमंडळाने केले आहे. या ग्रंथांमधून सभागृहातील विचारांचा ठेवा नवीन पिढीसमोर येणार आहे. त्यामुळे या ग्रंथाचे वाचन सर्वांनी करावे, असे आवाहनही केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button