वाशिम-अमरावती शिवशाही बसचा भीषण अपघात

कारंजा लाड | वाशिम ते अमरावती जाणाऱ्या शिवशाही बसचा भीषण अपघात कारंजा लाड शहरातील सावरकर चौकात सोमवारी सकाळी झाला. MH 06 BW 4341 क्रमांकाच्या बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे बसचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.
अपघातात बसचालक आणि वाहक गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कारंजा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्य सुरू केले व सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी ट्रकचा वेग आणि निष्काळजीपणा हे संभाव्य कारण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.



