गोवा अरपोरा नाईट क्लबमध्ये भीषण स्फोट; २५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

गोवा : अरपोरा परिसरातील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या भयावह दुर्घटनेत तब्बल २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
घटना घडताच आग काही मिनिटांत संपूर्ण क्लबमध्ये पसरली. अग्नीशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मृतांमध्ये किचन कर्मचारी, तीन महिला तसेच काही परदेशी पर्यटकांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री घटनास्थळी; दोषींवर कठोर कारवाईची घोषणा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्रीच घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई होईल असे आश्वासन दिले.
राष्ट्रपती व पंतप्रधानांचा शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या दुर्घटनेमुळे राज्यातील नाईट क्लब आणि हॉटेलमधील सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते का, यासंदर्भातही तपास सुरू आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या चौकशी अहवालानंतर दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



