अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावरच हल्ला; तलाठ्याची धक्कादायक कृत्य

अर्धापूर, नांदेड: नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार आणि नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे यांच्यावर त्यांच्या कार्यालयातीलच तलाठ्याने हल्ला केल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.
घटना अशी की, महादेव पिंपळगाव परिसरात अवैध वाळू उत्खननाची माहिती मिळताच नायब तहसीलदार शिंदे संध्याकाळच्या सुमारास गस्तीवर होते. प्रशासनाच्या टीमने वाळू वाहून नेणारे अवैध टिपर ताब्यात घेतले. त्याचवेळी अनपेक्षित प्रकार घडला.
कारवाईदरम्यान तहसील कार्यालयातीलच एका तलाठ्याने हस्तक्षेप करत शासकीय कारवाईत अडथळा निर्माण केला, असा आरोप आहे. त्यानंतर तलाठ्याने नायब तहसीलदार शिंदे यांना धक्काबुक्की केली आणि मारहाण केल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
ताब्यात घेतलेली सर्व वाहने नंतर तहसील कार्यालयात ठेवण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाची तक्रार अर्धापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अवैध वाळू उत्खनन, प्रशासनातील अंतर्गत वाद आणि शासकीय अधिकाऱ्यावर झालेला हल्ला यामुळे अर्धापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.



