AmravatiamravatinewsLatest News

अमरावतीत ‘विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण’ कार्यान्वित; पोलिसांविरुद्ध तक्रारींसाठी नागरिकांना नवे व्यासपीठ

अमरावती, दि. 05 – पोलिसांकडून अधिकारांचा गैरवापर, गैरवर्तन किंवा गंभीर कायदेशीर उल्लंघन झाल्यास नागरिकांना स्थानिक पातळीवर निष्पक्ष चौकशीची सुविधा मिळावी, यासाठी अमरावती शहरात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण (DPCA) अधिकृतपणे कार्यान्वित झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकाश सिंग (2006) प्रकरणातील आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने हे प्राधिकरण स्थापन केले आहे.

या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उषा ठाकरे, तर सदस्य म्हणून पी.टी. पाटील (निवृत्त पोलीस अधीक्षक) आणि पंकज निखार (नागरी सदस्य) कार्यरत आहेत. पोलिसांविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी या प्राधिकरणाशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालय प्रमुख तथा पोलीस उपआयुक्त रमेश धुमाळ यांनी केले आहे.


प्राधिकरणाचे कार्यालय व संपर्क

  • कार्यालय कार्यान्वित: फेब्रुवारी 2025
  • पत्ता: विशेष आय.जी.पी. बंगला ते शासकीय विश्राम गृह रोड,
    गुलमोहर अपार्टमेंट शेजारी, कॅम्प, अमरावती – 444602
  • दूरध्वनी: 0721–2990306
  • ई-मेल: dpca.amt@mahapolice.gov.in

कोणत्या प्रकारच्या तक्रारींची चौकशी येथे केली जाते?

प्राधिकरणाला खालील गंभीर बाबींवर चौकशीचा अधिकार आहे:

  • पोलीस कोठडीत मृत्यू किंवा गंभीर दुखापत
  • बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न
  • नियमबाह्य / बेकायदेशीर अटक
  • भ्रष्टाचार, खंडणी उकळणे
  • जमीन/घर बळकावणे
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून झालेला गैरवर्तन किंवा अधिकारांचा गैरवापर

टीप: पोलीस उपअधीक्षक (DySP) किंवा त्यावरील अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई यांच्याकडे केल्या जातील.


तक्रार कशी दाखल करावी?

  • तक्रार लेखी स्वरूपात (मराठी/हिंदी/इंग्रजी) साध्या कागदावर देता येते.
  • किंवा प्राधिकरणाच्या वेबसाईटवर ऑनलाईन दाखल करता येते.
  • तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  • तक्रारीची चौकशी करून तथ्य आढळल्यास प्राधिकरण संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करते.

महाराष्ट्रातील विभागीय प्राधिकरणे

अमरावतीसह राज्यात एकूण सहा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणे कार्यरत आहेत:

  1. पुणे
  2. नाशिक
  3. नागपूर
  4. छत्रपती संभाजीनगर
  5. कोकण विभाग (नवी मुंबई)
  6. अमरावती
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button