अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सरची दुर्मिळ व जटिल शस्त्रक्रिया यशस्वी; 60 वर्षीय महिलेचा जीव वाचला

अमरावती: सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय), अमरावती येथे कॅन्सरची अत्यंत दुर्मिळ, जटिल आणि उच्च जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. Sternotomy तंत्राचा वापर करून करण्यात आलेली ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याने तिचे विशेष महत्त्व मानले जात आहे.
सदर रुग्ण अचलपूर येथील 60 वर्षीय महिला असून तिच्या मेडियास्टिनममधील कॅन्सरची (छातीच्या मध्यभागातील गाठ) शस्त्रक्रिया करण्यात आली. ही जागा अत्यंत संवेदनशील असून हृदय, मोठ्या रक्तवाहिन्या, श्वासनलिका, अन्ननलिका आणि थायमस यांसारख्या अत्यावश्यक अवयवांच्या जवळ असल्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची मानली जाते.
उच्च कौशल्य, अचूकता आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयाची मागणी करणारी ही शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ञ डॉ. अतुल यादगिरे आणि हृदयरोग तज्ञ डॉ. सुधीर धांडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन प्राप्त झाले असून संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली.
शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये बधीरीकरण तज्ञ डॉ. सचिन गोंडाने, डॉ. रमनिका ढोमणे, डॉ. रोहिणी राठोड, डॉ. माधुरी गाडेकर, डॉ. किरण पारिसे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले.
याशिवाय अधिसेविका चंदा खोडके यांच्या समन्वयानुसार
इन्चार्ज सिस्टर संगीता आष्टेकर, कविता बेरड, प्रियंका गायकवाड, वैष्णवी मरकाडे, सुमित्रा कोरे, वैभवी कोथळकर, जिमी कांबळे, लक्ष्मण वाळूकर, अथर्व लोंढे, शारदा राठोड, जीवन तेलमोरे यांनीही शस्त्रक्रियेत मोलाची मदत केली.
ही यशस्वी शस्त्रक्रिया जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची दिशा दाखवणारी ठरली आहे.



