वाशिम जिल्ह्यातील चार नगरपालिका निवडणुकीत 65.47% मतदान; निकाल 21 डिसेंबरला

वाशिम : रिसोड, मंगरुळपीर, कारंजा या तीन नगर परिषदांसह मालेगाव नगर पंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. चारही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण 65.47% मतदान नोंदवण्यात आले असून निकालासाठी आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबर या दिवशी खिळून राहणार आहे.
चारही ठिकाणी मतदारांनी अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद दिला.
- रिसोड नगर परिषद – 71.22%
- मंगरुळपीर नगर परिषद – 65.76%
- कारंजा नगर परिषद – 62.13%
- मालेगाव नगर पंचायत – 68.32%
मतदान सुरळीत पार पडले असले तरी निकाल जाहीर होईपर्यंत राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापले आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना यांनी सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोहीम उभारली होती. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि घटकपक्षांनीही प्रभावी प्रचार मोहीम राबवत मुकाबला दिला.
यासोबतच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम तसेच अनेक अपक्ष उमेदवारांनाही त्यांच्या जागांवर विजयाची आशा आहे. त्यामुळे चुरशीची निवडणूक झाल्यानंतर निकालाची प्रतीक्षा अधिक रोमहर्षक ठरत आहे.
जिल्ह्याच्या राजकीय तापमानात हिवाळ्यातही उष्णता जाणवत असून, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव – येथे अखेर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहण्यासाठी नागरिक, कार्यकर्ते आणि सर्वच पक्षांचे नेते उत्सुक आहेत.



