Latest NewsMaharashtraNagpur

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबरदरम्यान नागपूरमध्ये; शासकीय सुट्टी असूनही दोन्ही सभागृहांचे कामकाज

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार हे दोन्ही दिवस शासकीय सुट्टीचे असतानाही दोन्ही सभागृहांचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, तसेच मंत्री वर्ग व विधिमंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.

संविधानाच्या अमृत महोत्सवी वाटचालीवरील पुस्तकाचे प्रकाशन ९ डिसेंबरला

भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या ऐतिहासिक पर्वानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत विशेष चर्चा घेण्यात आली होती. त्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून तयार करण्यात आले आहे.

हे पुस्तक मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रकाशित केले जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकीत दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठीची सर्व तयारी यानंतर अंतिम टप्प्यात आली असून राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आता अधिवेशनाच्या कार्यवाहीकडे लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button