AmravatiLatest News

अमरावतीत कचरा व्यवस्थापन कोलमडले; कोणार्क कंपनीकडे वाहन–कर्मचारी नसल्याने दोन दिवस कचरा संकलन ठप्प

अमरावती : शहरातील नागरिक गेल्या दोन दिवसांपासून कचऱ्याच्या गंभीर समस्येमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. १ डिसेंबरपासून शहराचा कचरा संकलनाचा करार मुंबईच्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे गेला, मात्र कंपनीकडे आवश्यक तेवढी वाहने आणि कर्मचारी नसल्यामुळे कचरा उचलण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे.

शहरातील अनेक भागांत कंटेनर भरून वाहत असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: परकोट परिसरातील साबनपुरा भागात परिस्थिती बिकट झाली आहे. कंटेनर ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावर कचरा पसरला असून परिसर पूर्णपणे निवासी असल्याने आरोग्यधोक्याची चिंता वाढली आहे. मनपाचे अधिकारी या भागात दोन दिवसांपासून पाहणीसाठी न फिरल्याने नागरिक अधिक नाराज आहेत.

दरम्यान, मंगळवारी दुपारी एका कंटेनरला अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. नागरिकांच्या तातडीच्या सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

कचरा उचलला जात नसल्याबाबत विचारले असता मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले,
“कोणार्कचा नवीन करार आहे. शहर समजून घेण्यासाठी दोन–तीन दिवस लागतील.”

मात्र या स्पष्टीकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत —
👉 कोणार्क कंपनीने शहराची रचना न जाणून करार कसा स्वीकारला?
👉 वाहनं नाहीत, कर्मचारी नाहीत… तरीही काम सुरू कसं करण्यात आलं?

नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर कोणार्क कंपनीने अखेर पूर्वी शहरात कार्यरत पूजा कंपनीकडून वाहनं आणि कर्मचारी भाड्याने घेतले आहेत.

आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहरात सुरू केलेल्या स्वच्छतेच्या उपक्रमावर या गोंधळामुळे पाणी फिरल्याचे चित्र नागरिकांमध्ये दिसत आहे. शहरात लवकरात लवकर सुरळीत कचरा संकलन सुरू करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button