AmravaticitynewsHelth CareLatest News

अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पहिलीच दुर्मिळ कॅन्सरवरील लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे प्रथमच अत्यंत दुर्मिळ व जटिल ‘कार्सिनोसार्कोमा’ (Malignant Mixed Müllerian Tumour) या गर्भाशयाच्या कॅन्सरवर पूर्णतः लॅप्रोस्कोपिक (दुर्बिणीतून) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यवतमाळ येथील 65 वर्षीय महिलेला करण्यात आली असून तिची प्रकृती आता पूर्णपणे उत्तम आहे.

रुग्ण रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्रावासह हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. तपासण्यानंतर बायोप्सीद्वारे दुर्मिळ कार्सिनोसार्कोमा कॅन्सरचे निदान झाले. या कॅन्सरमध्ये फक्त गर्भाशय काढून चालत नाही; तर परामीट्रियम, लसिकागाठी, ओमेंटम यांसह शरीरातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांच्या जवळ प्रचंड अचूकतेने काम करावे लागते. ही प्रक्रिया सामान्यतः ओपन सर्जरी पद्धतीने करणेही आव्हानात्मक मानले जाते; परंतु अमरावतीत ही संपूर्ण जटिल शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडली.

लॅप्रोस्कोपीमुळे रुग्ण 24 तासांत चालू-फिरू लागली
लॅप्रोस्कोपिक तंत्रामुळे रुग्णाला कमी वेदना, कमी रक्तस्त्राव, लहान जखमा आणि अतिशय वेगवान पुनर्प्राप्तीचा फायदा झाला. शस्त्रक्रियेनंतर केवळ 24 तासांत रुग्ण चालू-फिरू लागली. रुग्णाला पुढील केमोथेरपीची सुविधा देखील याच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विनामूल्य करण्यात आली.

शस्त्रक्रियेत तज्ञ डॉक्टरांचा मोलाचा सहभाग
ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तज्ञ डॉ. आयुष अजयकुमार हेडा, भूलतज्ञ सपना अग्रवाल, डॉ. रोहिणी राठोड, डॉ. माधुरी गाडेकर, डॉ. स्नेहल चव्हाण, डॉ. ऐश्वर्या रायबोले, डॉ. किरण पारीसे आणि संपूर्ण नर्सिंग व तांत्रिक टीम यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आली.

“लॅप्रोस्कोपी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपचारांचा मानक” — डॉ. आयुष हेडा
डॉ. आयुष हेडा म्हणाले, “मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये ज्या प्रकारच्या अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक कॅन्सर शस्त्रक्रिया ‘स्टँडर्ड ऑफ केअर’ आहेत, तीच सुविधा आता अमरावतीत उपलब्ध होत आहे. कमी वेदना, कमी रक्तस्त्राव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्ण 24 तासांत चालू-फिरू शकतो—ही या तंत्रज्ञानाची मोठी ताकद आहे.”

अमरावतीत प्रथमच केलेल्या या उच्चस्तरीय व सूक्ष्म ऑनकोलॉजिकल शस्त्रक्रियेमुळे जिल्ह्यात कॅन्सर उपचारांच्या प्रगत आणि आधुनिक सुविधांना नवा आयाम प्राप्त झाला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button