AmravatiLatest NewsLocal News

हिंद दी चादर कार्यक्रम: गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समारोहात सक्रिय सहभागाचे मान्यवरांचे आवाहन!

अमरावती : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे ७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात अमरावती जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे कळकळीचे आवाहन जिल्हास्तरीय बैठकीत मान्यवरांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात आज या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या तयारीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, महंत जितेंद्रजी महाराज, राज्यस्तरीय समितीचे सदस्य किसन राठोड यांच्यासह सदाशिव चव्हाण, नंदू पवार, डॉ. निख्खू खालसा, रवींद्रसिंग सलुजा, अनिता पवार, छाया राठोड, बबीता राठोड, ॲड. नवलानी, वासुदेव महाराज, दिनेश सचदेव आदी उपस्थित होते.

धर्मरक्षण आणि संस्कृती संवर्धनाचा उद्देश
महंत जितेंद्र महाराज यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, या शहिदी समागमाचे आयोजन सर्व समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. धर्म रक्षणासाठी गुरु तेग बहादूर यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण व्हावी, तसेच आपली समृद्ध संस्कृतीची जाण नव्या पिढीला व्हावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या या महान त्यागाची माहिती पुढील काळातही समाजाला मिळण्यास या कार्यक्रमामुळे मदत होईल.

राज्यस्तरीय समितीचे सदस्य किसन राठोड यांनी शासनाची भूमिका मांडली. गुरु तेग बहादूर यांची शहादत ही संपूर्ण मानवतेसाठी होती आणि त्यांच्या बलिदानामुळेच देश टिकून आहे. त्यांचे स्मरण व्हावे, तसेच समृद्ध इतिहासाची माहिती समाजाला होण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा. शासनाने हा एक चांगला उपक्रम हाती घेतला असून, राज्यभरात तीन कार्यक्रम होणार आहेत. प्रचार व प्रसारासाठी गाव आणि तांड्यामध्ये चित्ररथ फिरवण्यात येत असून, नागरिकांच्या भेटी घेतल्या जात आहेत. शाळांमधून त्यांच्या जीवनावरील चित्रफीत देखील दाखवली जात आहे.

त्यांनी आवाहन केले की, “संपूर्ण समाजाने सेवक होऊन या कार्यक्रमात सहभागी व्हावे. शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे देश घडविण्यासाठी नागपूर येथील कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे.”

जिल्हा प्रशासनाची तयारी
निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

आतापर्यंत लोकसभागातून चार बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

अमरावती ते नागपूर मार्गावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहे.

त्यांनी यावेळी समाजातील दानशूर व्यक्तींनी या व्यवस्थेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

डॉ. निख्खू खालसा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले आणि गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावरील चित्रफीत दाखवण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button