दुर्घटना नव्हे, हत्या!’ दत्त मंदिर अपघाताप्रकरणी शिवसेना शहरप्रमुखांचे PWD, RTO व वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप; उग्र आंदोलनाचा इशारा
अमरावती : अमरावती-बडनेरा रोडवरील दत्त मंदिर, कुंभारवाडा बजरंग चौक अबागेट परिसरात सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) च्या हलगर्जीपणामुळे झालेल्या अपघातात दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या शिवसेनेने आज (दि. १ डिसेंबर २०२५) आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना शहरप्रमुख प्रवीण वसंतराव हरमकर यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे लेखी तक्रार करत या घटनेला केवळ ‘अपघात नव्हे, तर विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेली हत्या’ असल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
हरमकर यांनी आपल्या निवेदनात या ‘हत्याकांडा’साठी PWD सोबतच अमरावती RTO आणि अमरावती वाहतूक पोलिसांनाही जबाबदार धरले आहे.
तक्रारीतील मुख्य मुद्दे:
धोकादायक रपटा: अपघातस्थळी असलेल्या रपट्याच्या उंचीत एक ते दीड फुटाचा फरक होता.
निष्काळजीपणा: या धोकादायक ठिकाणी कोणताही सावधगिरीचा फलक अथवा झेब्रा क्रॉसिंग नव्हते. याच कारणामुळे गाडी उसळून बॅलन्स बिघडला आणि अपघात झाला.
अपघातानंतर तत्परता: अपघातानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी घाईगडबडीत त्या रपट्यावर डांबरीकरण करण्यात आले, जेणेकरून बाहेरील लोकांना काम सुरळीत झाल्याचे भासावे.
प्रवीण हरमकर यांनी मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची त्वरित शहानिशा (चौकशी) करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि मृतकांच्या नातेवाईकांना न्याय देण्यात यावा.
कार्यकारी अभियंत्यांकडून आश्वाासन
निवेदन स्वीकारल्यानंतर कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी शिवसेना शिष्टमंडळाला एक ते दोन दिवसांत घटनास्थळी स्वतः पाहणी करणार असल्याचे आणि ट्रॅफिक ऑफिस आणि RTO ऑफिस सोबत समन्वय साधून या प्रकरणावर निश्चित कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
उग्र आंदोलनाचा इशारा
प्रवीण हरमकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन नियमानुसार योग्य ती कारवाई झाली नाही, तर शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, RTO आणि अमरावती ट्रॅफिक विभागाची राहील.
यावेळी निवेदन देतेवेळी विजय ठाकरे (उपशहर प्रमुख), संजय गव्हाणे (उपशहर प्रमुख), आनंद शेळके (उपशहर प्रमुख), बाबुराव तायवाडे (उपशहर प्रमुख), विजय मंडाळकर, संजय इंगोले, श्रीकांत शर्मा (युवा सेना सरचिटणीस), जुगल दवे, गोविंदा दारणा, कमलेश गुप्ता, निकेश शर्मा, प्रवीण केशर वाणी, अजय बोबडे, मनीषा प्रमुख रामा सोळंके, प्रमोद वानखडे (उपजिल्हाप्रमुख), सुलतान शहा, असलम खान (उपशहर प्रमुख), बाळा सावरकर (प्रमुख), सागर डोके (विभाग प्रमुख) यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



