दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची शक्ती-प्रदर्शन सभा; उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांच्या प्रचाराला जोर

दर्यापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांच्या प्रचारार्थ मौलाना आझाद मैदानावर मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला काँग्रेसचे राज्यसभा खासदार इमरान प्रतापगडी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. आपल्या भावनिक व प्रभावी भाषणातून प्रतापगडी यांनी दर्यापूरवासीयांना संबोधित करत, “मागील निवडणुकीतील चुका टाळून यावेळी योग्य निर्णय घ्या” असे आवाहन केले.
या वेळी खासदार बलवंत वानखडे यांनी शहराच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीबाबत माहिती दिली. प्रतापगडी यांनी राज्यसभेमार्फत दर्यापूरच्या विकासासाठी पूर्ण मदत करण्याची तयारी व्यक्त केली. त्यांच्या भाषणातील शेरोशायरी आणि गझलांना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सभेमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार बलवंत वानखडे, सुधाकरराव भारसाकडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दर्यापूरमधील काही नागरिकांनी या निवडणुकीत विविध समाजघटकांचा कल काँग्रेसकडे असल्याची भावना व्यक्त केली. 2016 च्या निवडणुकीचा उल्लेख करत, “या वेळी एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल” असेही काही नागरिकांनी सांगितले.
सभेच्या शेवटी इमरान प्रतापगडी यांनी उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करत, “विजय मिळाल्यानंतर पुन्हा दर्यापूरला भेट देणार” असे आश्वासन दिले.



