स्वासीन गावात हृदयद्रावक घटनापती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू, किरकोळ वादातून दु:खद अंत

स्वासीन गावात हृदयद्रावक घटनापती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू, किरकोळ वादातून दु:खद अंत
मंगरुळपीर तालुक्यातील स्वासीन गावात बुधवारी रात्री पती-पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयपिळवटून टाकणारी घटना घडली. किरकोळ वादातून पेटलेले भांडण काही क्षणांतच भीषण शोकांतिकेत बदलले.
अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात संध्याकाळी किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात घराबाहेर पडत सीमाने काही अंतरावरील शेतातील विहिरीत उडी मारली. हे पाहताच पती अमोल यांनीही जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारत पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली आणि अंधारामुळे दोघेही बुडाले.
घरातून बाहेर पडलेले दाम्पत्य परत न आल्याने गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. विहिरीजवळ सीमाची चप्पल आढळल्याने संशय बळावला. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले.
गुरुवारी सकाळी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
अमोल आणि सीमाच्या मृत्यूने संपूर्ण स्वासीन गाव शोकसागरात बुडाले आहे. त्यांच्या मागे 15 वर्षांचा मुलगा आणि 12 वर्षांची मुलगी असा दोन निरागस मुलांचा आधार हरपला आहे. मंगरुळपीर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.



