रामबाग परिसरात पिता–पुत्रावर विटांनी हल्ला; इमामवाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

नागपूर – इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामबाग परिसरात पिता–पुत्रावर विटांनी जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती इमामवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी दिली आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या वादातून आरोपीने दोघांवर विटांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पिता आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
प्रकरणाची माहिती मिळताच वपोनी युनिट 3 चे महेश सागडे आणि इमामवाडा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे जप्त केले असून साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी सांगितले की, हल्ल्यामागील कारण समजण्यासाठी सखोल तपास सुरू असून आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल. दरम्यान, रामबाग परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



