नांदगाव APMC मध्ये गोंधळाचा कळस; हजारो शेतकरी रांगेत अडकले, अधिकारीच पळून गायब

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज अभूतपूर्व गोंधळ उडाला. मका-बाजरी खरेदीसाठी पास मिळवण्यासाठी पहाटेपासून हजारो शेतकरी रांगेत उभे असताना अचानक संपूर्ण व्यवस्था कोलमडली. फेडरेशनची नोंदणी करणारे संबंधित अधिकारी APMC आवारातून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
समृद्धी पोर्टलवरील खरेदीसंदर्भातील सरकारी दावे आणि मोठमोठ्या घोषणांच्या उलट जमिनीवरची परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसून आली. सिस्टीम डाऊन, सर्व्हर फेल आणि तांत्रिक अडचणींमुळे तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
अनेक शेतकरी उपाशी, काही तापाने त्रस्त, तर काही कागदपत्रांसह अनिश्चिततेत उभे… पण पास मात्र मिळेना. पाण्यासाठी धावपळ, जबाबदार अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही, आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकायला कोणीही पुढे आले नाही.
गुरुवारी नांदगावात शेतकऱ्यांचा एकच सवाल घुमला—
“आम्ही शेती कसली करायची? आणि कुणावर विश्वास ठेवायचा?”
सरकारच्या डिजिटल सेवा, पोर्टल्स आणि खरेदी योजनांचा मोठा गाजावाजा होत असतानाच प्रत्यक्ष व्यवहारात शेतकऱ्यांना घाम, त्रास आणि अपमान यांशिवाय काहीच हातात न पडल्याने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
प्रशासनाकडून या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. पुढील घडामोडींवर आमची नजर आहे.



