नंदनवनमध्ये मोठी कारवाई; मकर संक्रांतीपूर्वी मोठा नायलॉन मांजा साठा जप्त, एक अटकेत

नागपूरच्या नंदनवन परिसरात मकर संक्रांतीपूर्वी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने हसनबाग परिसरात ही कारवाई केली असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असू शकतो, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश सागडे यांनी दिली.
गोपनीय माहितीच्या आधारे 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पथकाने हसनबाग भागात छापा टाकला. छाप्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित नायलॉन मांजा आढळला व तो ताब्यात घेण्यात आला.
नायलॉन मांजा हा पर्यावरणासाठी अत्यंत घातक असून, विशेषतः पक्ष्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणारा मानला जातो. मकर संक्रांतीच्या काळात या मांजाचा वापर वाढत असल्याने पोलिसांनी अशा अवैध साठ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आणखी आरोपींचा सहभाग तपासात उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुन्हे शाखा पुढील कारवाईसाठी सज्ज असून, आगामी काळात अशाच छापेमाऱ्या वाढण्याची शक्यता आहे.



