कुर्डूवाडीत शिंदे–पवार युतीला भविष्यातील संकेत? शशिकांत शिंदेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विविध जिल्ह्यांमध्ये राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला असून, अनेक ठिकाणी महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तर काही ठिकाणी विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांशी थेट युती केली आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापुर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत आहेत. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे.
या युतीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कुर्डूवाडी येथे काल रात्री सभा घेतली. यावेळी केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
“ही युती भविष्यातील राजकारणाची नांदी ठरू शकते”
शशिकांत शिंदे म्हणाले की,
“आज कुर्डूवाडीत तुम्ही सर्वजण एकत्र आलात, ही एकता भविष्यातील राजकारणाची नांदी ठरू शकते. लढणारी माणसं कधीच शरणागती घेत नसतात.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिंदे गटाची युती होणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
सत्ता रोखण्यासाठी विरोधक एकत्र
कुर्डूवाडी नगरपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्या गटाची सत्ता रोखण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत युती-आघाड्या किती लवचिक झाल्या आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकण्यावर शरद पवारांचा टोला
दरम्यान, राज्यातील युती-आघाड्यांबाबत बोलताना शरद पवार यांनीही महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे.
“पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू आहे. अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप पवार यांनी केला.
तसेच मतदार योग्य निर्णय घेतील, असंही त्यांनी ठामपणे सांगितले आहे.



