संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे नागरिकांना पत्र“संविधानिक कर्तव्यांचे पालन हे मजबूत लोकशाहीचे अधिष्ठान”

संविधान दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 26 नोव्हेंबर 2025) देशातील नागरिकांना पत्राद्वारे संबोधित करताना संविधानिक कर्तव्यांचे पालन हे देशाच्या सबलीकरणासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांनी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडल्यास “विकसित भारताच्या उभारणीस अर्थपूर्ण योगदान देता येईल,” असे त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्रात मताधिकाराचा योग्य वापर हा लोकशाही बळकट करण्याचा प्रमुख आधार असल्याचे अधोरेखित केले. तसेच भारताच्या प्रगतीला स्पष्ट दिशा देत आलेल्या या ‘पवित्र दस्तऐवजाचा’ गौरवशाली प्रवास त्यांनी यावेळी स्मरला.
मोदी यांनी आठवण करून दिली की, 2015 मध्ये एनडीए सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे संविधानाविषयी जागरूकता वाढविणे आणि नागरिकांच्या कर्तव्यांची जाणीव दृढ करणे हा उद्देश साधला जात आहे.
संविधान दिनानिमित्त पंतप्रधानांच्या या संदेशाचे व्यापक जनमानसात प्रतिबिंब उमटत असून, देशभरात संविधान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.



