नागपूर : कळमना परिसरात दहशत माजवणारे चार जण तीन महिन्यांसाठी हद्दपार

नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाणे हद्दीत वारंवार दहशत माजवणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या चार जणांना अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. परिमंडळ क्रमांक ०५ चे मा. पोलीस उपायुक्त निकेतन ब. कदम यांनी परिसरातील शांतता अबाधित राहावी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखावी या उद्देशाने ही कारवाई केली.
हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे –
- रिता उर्फ शितल मोटघरे
- संतोष उर्फ सरवन उईके
- सुनिता सोनकुसरे
- सरोज विश्वकर्मा
या चौघांवर दमदाटी, मारहाण, अवैध दारूविक्री, गावठी हातभट्टी चालवणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांचे अनेकदा दाखले नोंदवले गेले होते. पोलिसांनी वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई केली, चेतावणी दिली; मात्र सुधारणा न झाल्याने अखेर हद्दपारीचा निर्णय घेण्यात आला.
या आरोपींना तीन महिन्यांसाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामीण हद्दीत प्रवेशबंदी घालण्यात आली असून पारशिवनी, खापा, कन्हान, मौदा व कुही या पोलीस ठाण्यांच्या मर्यादेत प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे.
या कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली असून पुढील काळात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर अधिक कठोर उपाययोजना करण्याचे संकेत त्यांनी दिले.



