Amaravti GraminMaharashtra Politicspolitics

तिवसा तालुक्यात तिसऱ्या आघाडीची तयारी‖ सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचा एकमताने निर्णय

तिवसा तालुक्यात आता राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त तिसरा पर्याय उभा करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत सर्वपक्षीय बैठक घेतली. ही बैठक तिवसा विश्रामगृहात उत्साहात पार पडली.

देशातील सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर इतर लहान-मोठ्या पक्षांचे अस्तित्व कमी होत असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे तालुक्यात तिसरी भक्कम आघाडी उभी करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पर्याय निर्माण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भाई भूषण यावले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान कॉम्रेड राजाभाऊ बाबुळकर यांनी भूषवले.

बैठकीत विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भाई भूषण यावले, हेमंत बोबडे, विलास वावरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महादेव गार, काँग्रेसचे सुभाष खांडेकर, विठोबा लोणारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश सोनोने आणि चंद्रकांत वडस्कर, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेंद्र भिवगडे व प्रवीण केने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिलीपराव भुयार, दीपक चवरे, दिवाकर माहुरे, शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार व शैलेश डहाके, वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप गवई, सारंग पाटील व शेखर मूंद्रे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीचे सिद्धार्थ मुंद्रे तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रहीम शहा यांचा समावेश होता.

सर्व नेत्यांनी एकमुखाने सांगितले की, तिवसा तालुक्यात उभी होणारी तिसरी आघाडी ही केवळ तालुक्यापुरती मर्यादित राहणार नाही, तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्येही मोठा बदल घडवू शकते. आगामी काळात आणखी काही बैठका घेऊन धोरणे निश्चित करण्यात येणार असून ही आघाडी निवडणुकांसाठी भक्कमपणे मैदानात उतरणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

तिवसा तालुक्यातील या नव्या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये रंगत वाढण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button