AmravatiamravatinewscitynewsLatest News

अमरावती महापालिका आयुक्त सौ. सौम्‍या शर्मा चांडक यांचा महादेवखोरी परिसर दौरा; विकासकामांना गती देण्याचे आदेश

अमरावती, २६ नोव्हेंबर २०२५ – अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज महादेवखोरी परिसराचा सविस्तर दौरा करून तेथील चालू असलेल्या विकासकामांची आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, अभियांत्रिकी शाखेचे कर्मचारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान आयुक्तांनी परिसरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा संकलन, नालेसफाई, पाणीपुरवठा व रस्त्यांची स्थिती यांचा बारकाईने आढावा घेतला. कचरा संकलनात झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी तातडीने सुधारणा करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच नालेसफाईची कामे गतीमान करण्यासह सर्व नाल्यांतील अडथळे पूर्णपणे दूर करण्याचे आदेश दिले

नागरिकांनी पाणीटंचाई, खराब रस्ते आणि सार्वजनिक प्रकाशयोजनेतील अडचणींबाबत तक्रारी मांडल्या. आयुक्तांनी प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागांना त्वरित उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्या म्हणाल्या, “महापालिकेचे उद्दिष्ट नागरिकांना प्रभावी आणि वेळेवर सेवा देणे आहे. कोणत्याही सुविधेबाबत होणारी दिरंगाई सहन केली जाणार नाही.”

महादेवखोरी परिसरातील प्रलंबित कामांचा आढावा घेत आयुक्तांनी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना निश्चित वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. रस्ते काँक्रीटीकरण, ड्रेनेज लाईन दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्पांना विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयुक्तांनी परिसरातील मूलभूत नागरी सुविधांची चाचपणी करत पुढील काही दिवसांत विशेष स्वच्छता आणि पायाभूत सुविधा सुधारणा मोहिम राबवण्याची घोषणा केली. या मोहिमेत रस्ते दुरुस्ती, झाडांची छाटणी, नालेसफाई, ड्रेनेज लाइन तपासणी आणि प्रकाशयोजनेची देखभाल यांना प्राधान्य दिले जाईल.

संपूर्ण पाहणी दरम्यान आयुक्तांनी महापालिकेच्या प्रशासनाचे नागरिकांच्या समस्या समजून तत्काळ उपाययोजना करण्याबाबतचे कटिबद्ध धोरण अधोरेखित केले. यामुळे महादेवखोरी परिसरातील विकासकामांना आणि सुविधा सुधारणा प्रक्रियेला निश्चितच गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या दौऱ्यात सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्थ्य निरीक्षक, मनपा कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button