Amaravti GraminAmravatiamravatinewsLatest News

अमरावतीत संविधान दिन जनजागृती अभियानाचे आज उद्घाटन‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

समाज कल्याण विभागातर्फे संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा शुभारंभ उद्या, दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या महर्षी रमण सभागृहात संविधान दिन जनजागृती अभियानाचे उद्घाटन करण्यात येणार असून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन आणि संविधान चित्ररथाचा शुभारंभही या वेळी होईल.

या विशेष उपक्रमात सर्व शासकीय निवासी शाळा, शासकीय व अनुदानित-विनाअनुदानित वसतिगृह, तसेच दिव्यांग संस्थांमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. सहायक आयुक्त आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही संविधान दिनानिमित्त अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

यात शाळा व महाविद्यालयांच्या दर्शनी भागात संविधान उद्देशिका लावणे, शालेय परिपाठ व वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविकेचे वाचन, शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती उपलब्ध करणे, संविधानाविषयी जनजागृतीसाठी व्याख्याने, तसेच संविधान दिन कार्यक्रमांतर्गत पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन, निबंध लेखन, भाषण, वादविवाद व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

याशिवाय प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. ‘संविधान संमेलन’सह दी. 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या जनजागृती उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त माया केदार आणि सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button