अमरावतीत संविधान दिन उत्साहात साजरा‖ इर्विन चौकात बाबासाहेबांना अभिवादनासाठी नागरिकांची मोठी गर्दी

26 नोव्हेंबर 1949—ज्या दिवशी भारताचे संविधान भारतीय जनतेस समर्पित झाले. तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर मसुदा समितीने तयार केलेले हे भव्य व सर्वोच्च कायदेचौकट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आकारास आले.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीमध्ये संविधान दिनाचे औचित्य साधत भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच इर्विन चौकातील बाबासाहेबांच्या स्मारकावर नागरिकांची गर्दी उसळली. सामाजिक संघटना, विद्यार्थ्यांचे गट, तरुण–तरुणी, महिला संघटना, विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनी स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नागरिकांनी मोठ्या आवाजात संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करत लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे स्मरण केले. अनेकांनी हातात संविधानाच्या प्रती, जागृती फलक आणि पोस्टर्स घेऊन संविधान जागरूकतेचा संदेश दिला. परिसरात देशभक्तीचे नारे, मार्गदर्शक भाषणे आणि हारार्पण सोहळ्यामुळे वातावरण भारावून गेले होते.
अमरावती पोलिसांनी सुरक्षेची योग्य व्यवस्था केली होती. तसेच अनेक शाळा–महाविद्यालयांनी संविधान प्रास्ताविक वाचन, जागृती रॅली आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून दिवसाचे औचित्य साजरे केले.
संविधान दिनानिमित्त संपूर्ण शहरात लोकशाहीच्या मूल्यांप्रती आदर आणि अभिमानाचा भाव दिसून आला.



