अमरावतीत नगरपरिषद निवडणुकीआधी युवा स्वाभिमानचा मोठा निर्णय‖ भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा

अमरावती जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची तयारी जोमात सुरू असताना, राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडवणारा निर्णय युवा स्वाभिमान संघटनेकडून घेण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान संघटनेने भाजपच्या सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.
अमरावतीत झालेल्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती स्वतः आमदार रवी राणा यांनी दिली. नगराध्यक्ष पदासाठी भाजपला पूर्ण पाठिंबा देत असतानाच, नगरसेवक पदांसाठी मात्र भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवा स्वाभिमानच्या या भूमिकेमुळे आगामी नगरपालिका निवडणुकांतील राजकीय समीकरणांवर थेट परिणाम होणार असून भाजपला महत्त्वाची ताकद मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी काळात या निर्णयाचा निवडणुकीवर कसा परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



