Accident NewsAmaravti GraminAmravaticitynews

नांदगाव पेठ – माहुली जहागीर रोडवर पेट्रोल टँकरला भीषण आग; मोठा अनर्थ टळला

नांदगाव पेठ ते माहुली जहागीर रोडवर मंगळवारी सकाळी पेट्रोलच्या टँकरला भीषण आग लागण्याची थरारक घटना घडली. रस्त्यावर पाइपलाइनचे काम सुरू असल्याने निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे टँकरचा तोल जाऊन तो रस्त्याच्या कडेला उलटला आणि क्षणार्धात पेट घेऊन टँकर ज्वाळांनी भडकला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अमरावतीवरून मोर्शीकडे पेट्रोलने भरलेले तीन टँकर एकामागून एक जात होते. पहिला टँकर खोल खड्ड्यात गेल्याने पलटी झाला आणि त्यातील पेट्रोल रस्त्यावर पसरताच ताबडतोब प्रचंड आग भडकली. ज्वाळांचा मोठा लोट आणि धुराचे ढग पाहताच मागे येणाऱ्या दोन टँकरच्या चालकांनी प्रसंगावधान राखत वाहनं तात्काळ मागे घेतली. त्यांच्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा स्फोट आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस दल त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले असून सावधगिरीचा उपाय म्हणून रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र टँकर पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील कामामुळे झालेल्या खोदाई आणि दुरुस्तीसह असलेल्या धोकादायक परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून या मार्गावरील दुरुस्तीची तातडीने मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button