दारापूर गावात 10 फूट लांबीचा अजगर; सर्पमित्रांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

भातकुली तालुक्यातील दारापूर गावात रविवारी सायंकाळी तब्बल 10 फूट लांबीचा आणि सुमारे 9 किलो वजनाचा भला मोठा अजगर दिसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी तात्काळ माहिती सर्पमित्रांना दिली आणि अल्पावधीतच सर्पमित्र अजय हिवराळे आणि राहुल पांडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या धाडस आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, गावातील एका शेतजमिनीत या अजगराने आश्रय घेतला होता. अचानक असा मोठा साप शेतात आढळताच ग्रामस्थांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला. माहिती मिळताच सर्पमित्रांनी परिस्थितीचे नीट निरीक्षण करून कौशल्याने अजगराला पकडले. संपूर्ण रेस्क्यूदरम्यान ग्रामस्थ सुरक्षित अंतरावर उभे राहून पाहत होते.
अजगर सुरक्षित पकडल्यानंतर सर्पमित्रांनी वन्यजीव संरक्षणाच्या नियमांनुसार संध्याकाळच्या सुमारास त्याला जंगल परिसरात निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. या धाडसी आणि जबाबदार कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले असून सर्पमित्रांनी वन्यजीव संरक्षणाची दाखवलेली सजगता आणि तत्परता आदर्श ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.



