तिवसा : तालुक्यात तिसऱ्या आघाडीची भक्कम उभारणी – सर्वपक्षीय नेत्यांचा निर्धार

देशातील बदलत्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यात नवीन राजकीय समीकरणाचा पाया रचला जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्याकडून इतर पक्षांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत तालुक्यातील विविध पक्षांनी एकत्र येत “तिसरी भक्कम आघाडी” उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सशक्त पर्याय निर्माण करण्याचा संकल्प घेऊन आयोजित सर्वपक्षीय महत्त्वपूर्ण बैठक तिवसा विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली.
ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भाई भूषण यावले यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांनी तिसरी आघाडी ही तिवसा तालुक्याची वेळेची गरज असल्याचे मत मांडले. या आघाडीचा परिणाम जिल्हा राजकारणावरही सकारात्मक होणार असल्याचा विश्वास अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आगामी काळात आणखी काही बैठका घेऊन संघटनात्मकदृष्ट्या मजबूत तयारी करून तिसऱ्या आघाडीला निवडणूक रणांगणात उतरविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीतून समोर आली.
बैठक कॉम्रेड राजाभाऊ बाबुळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भाई भूषण यावले, हेमंत बोबडे, विलास वावरे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महादेव गार, काँग्रेसचे सुभाष खांडेकर, विठोबा लोणारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश सोनोने, चंद्रकांत वडस्कर, प्रहार जनशक्ती पक्षाचे सुरेंद्र भिवगडे, प्रवीण केने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीपराव भुयार, दीपक चवरे, दिवाकर माहुरे, शिवसेना शिंदे गटाचे राहुल लांजेवार, शैलेश डहाके, वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप गवई, सारंग पाटील, शेखर मूंद्रे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षाचे सिद्धार्थ मुंद्रे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रहीम शहा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीतून तिवसा तालुक्यात तिसऱ्या प्रभावी आघाडीचा पाया रचण्याचा राजकीय संदेश स्पष्टपणे उमटला आहे.



