अमरावती – SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री चोरीचा थरार, पाच घरे फोडली; दोन दुचाकी लंपास

अमरावती शहरात चोऱ्यांच्या घटना वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साईनगर परिसरानंतर आता चक्क कडेकोट सुरक्षा असलेल्या SRPF कॅम्पमध्येच चोरट्यांनी धाड टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री पाच घरांची कुलूपे तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला, तर दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या.
सोमवारी मध्यरात्री फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ मध्ये ही घटना घडली. घटनेच्या वेळी काही कर्मचारी गडचिरोलीत बंदोबस्ताच्या कार्यावर होते तर काहीजण रजेवर होते. घरात कोणी नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
या प्रकरणी SRPF अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांकडे दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे.
कडेकोट बंदोबस्त असलेल्या SRPF कॅम्पमध्येच चोरी झाल्याने, शहरातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



