सावरगावजवळ बिबट्याचा अपघाती मृत्यू; परिसरात भीतीचं वातावरण

वाशिम जिल्ह्यातील अकोला–हैद्राबाद महामार्गावर आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली. वाशिम ते मालेगावदरम्यान सावरगावजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, सावरगाव बर्डे शिवारात नर आणि मादी अशा दोन बिबट्यांची जोडी मागील काही दिवसांपासून दिसत होती. यातल्या एका बिबट्याला आज पहाटे दोन ते तीन वाजताच्या सुमारास महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रेंजर, वनरक्षक आणि बचाव पथकाने पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. धडक देणारे वाहन आणि अचूक वेळ अद्याप स्पष्ट नसून, वेगवान वाहन हीच धडकेची मुख्य कारणीभूत शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर महामार्गावरील प्रवासी, स्थानिक नागरिक आणि युवक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले. मात्र दुसरा बिबट्या अजूनही परिसरात असल्याने वनविभागाने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे.



