Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

रब्बी हंगाम 2025 : राज्यांतर्गत पिकस्पर्धा जाहीर, शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

रब्बी हंगाम 2025 साठी कृषी विभागातर्फे अन्नधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मिळवलेल्या उत्तम उत्पादनाचा गौरव करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

कृषी विभागाने सांगितले की, अनेक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करून उत्पादकतेत लक्षणीय वाढ साधत आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्याचा फायदा परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही मिळू शकतो. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेचा उद्देश राज्यातील एकूण उत्पादन वाढविणे हा आहे.

रब्बी हंगाम 2025 मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पाच पिकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सर्वसाधारण तसेच आदिवासी गटात स्पर्धा होणार आहे. शेतकऱ्यांकडे जमीन स्वतःच्या नावावर असावी आणि त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्र सलग लागवडीत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी सहभाग घेता येईल.

स्पर्धेसाठी अर्जासोबत 7/12, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (असल्यास), बँक खात्याची प्रत आणि पिक क्षेत्राचा नकाशा जोडणे आवश्यक असेल. सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 असून त्या दिवशी सुट्टी असल्यास पुढील कार्यदिवस लागू होईल. विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर अनुक्रमे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी 50 हजार, द्वितीय 40 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button