परतवाडा : नवनीत राणा यांच्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढले – मुस्लिम उमेदवारांवर टीकेने निवडणूक प्रचार घेतला वेगळाच रंग

परतवाडा नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा उरलेकांड सुरू असताना राजकारणाची दिशा पुन्हा एकदा धार्मिक आणि जातीय मुद्द्यांकडे वळताना दिसत आहे. भाजप खासदार नवनीत राणा यांनी पालिकेच्या प्रचार सभेत काँग्रेसकडून उभे करण्यात आलेलेल्या मुस्लिम उमेदवारांवर केलेल्या टीकेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
शनिवारी परतवाड्यात आयोजित मोठ्या सभेत राणा यांनी भाषणाची सुरुवात विकास, सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवरून केली. मात्र काही वेळातच भाषणाची धार थेट विरोधकांकडे वळली आणि काँग्रेस उमेदवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले.
राणा यांनी परतवाडा, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा आणि चांदूर बाजार या भागांमध्ये काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवारांना दिलेल्या संधीमागे “ठराविक राजकीय हेतू” असल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये आश्चर्य, कौतुक आणि नाराजी यांची मिश्र प्रतिक्रिया उमटली.
सभेनंतर शहरात तसेच सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. समर्थकांनी राणा यांच्या भूमिकेला साथ दिली असली तरी विरोधकांनी टीकेचा भडिमार करत हा प्रयत्न समाजात अनावश्यक विभागणी निर्माण करणारा असल्याचा आरोप केला आहे.
या घडामोडींमुळे परतवाडातील निवडणूक प्रचार आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः मुस्लिम समाजाकडून तीव्र प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आता पुढील काही दिवसांत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष यावर काय भूमिका मांडतील, तसेच वादग्रस्त चर्चेचा निवडणुकीच्या पुढील टप्प्यावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



