मुदखेड : “आमच्या बाप्पाची पुण्याई आहे… तुमच्या बाप्पाचं काय?” – अशोक चव्हाणांचा विरोधकांवर थेट वार

मुदखेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच तापला आहे. सभांमधील आरोप-प्रत्यारोप, राजकीय विधानं आणि वाढती टीका यामुळे वातावरण अधिकच चुरशीचं बनलं आहे. अशातच भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेलं वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शनिवारी रात्री झालेल्या सभेत भाषण करताना अशोक चव्हाण यांनी विरोधकांच्या प्रचार पद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले,
“निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप असतात, पण प्रचार खालच्या पातळीवर नेण्याची पद्धत योग्य नाही. आमच्या बाप्पाची पुण्याई आहे… पण तुमच्या बाप्पाचं काय?”
चव्हाण यांच्या या प्रश्नावर सभेत मोठा टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी त्यांनी स्व. शंकरराव चव्हाणांचा उल्लेख करत पुढे म्हटलं,
“शंकरराव चव्हाण अजरामर झाले… त्यांच्या नावावर मी मत मागत नाही. पण त्यांच्या पुण्याईला महाराष्ट्र विसरणार नाही.”
अशोक चव्हाण यांच्या भाषणातून स्पष्ट होतं की विरोधकांच्या प्रचारात वैयक्तिक पातळीवर टीका वाढली असून त्याबद्दल ते नाराज आहेत.
निवडणुका जवळ येत असताना सभांतील भाषणं अधिक तीव्र होत असून, मुदखेडमधील प्रचाराने आता तापलेलं राजकीय वातावरण आणखी चुरशीचं होण्याची चिन्हं दिसत आहेत.



