Latest News

2047 पर्यंत काँग्रेस संपली – चंद्रशेखर बावनकुळे

वाशिमच्या मालेगाव शहरात आज भाजप कार्यकर्ता मेळाव्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “केंद्रात आणि राज्यात 2047 पर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसकडे विकासाचा कोणताही ठोस व्हिजन नाही… त्यामुळे जनता त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही. भाजपा महायुतीने गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांवर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी त्यांनी निवडणुकीच्या आकडेवारीचाही उल्लेख केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला तब्बल 3 कोटी 18 लाख मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर काँग्रेससह महाविकास आघाडीला २ कोटी १८ लाख मते मिळाल्याने जनता कोणावर विश्वास ठेवते हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय मागील निवडणुकीत फडणवीस सरकारला राज्यातील जनतेने १ कोटी पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं, हा उल्लेख करून त्यांनी पुन्हा एकदा लोकप्रियतेचा दावा केला. २०२९ मध्ये राज्यात पुन्हा भाजपा महायुतीचे सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजप नगराध्यक्ष नागेश बळी यांच्यासह १७ नगरसेवकांच्या प्रचारासाठी आयोजित मेळावा उत्साहात पार पडला. बावनकुळे यांच्या भाषणानंतर कार्यक्रमस्थळी मोठी घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटले – “तोपर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित-किंचित होणार आहे… लोकांचा विश्वास संपला आहे.”
या वक्तव्याने जिल्ह्यात आणि राज्यभरात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button