पालघरमध्ये माजी अंडर-16 फुटबॉलपटू सागर सोरतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

मुंबईचा माजी अंडर-16 फुटबॉल खेळाडू सागर सोरती याचा मृतदेह 18 नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यात मेंढावन खिंड जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी पोलिसांना आत्महत्येचा संशय आहे.
15 नोव्हेंबर रोजी सागर घरातून “पुण्यात फुटबॉल खेळायला जातो” असे सांगून बाहेर पडला होता, मात्र त्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तो गेल्या दोन वर्षांपासून मानसिक तणावात होता. धाकट्या भावाच्या आगामी विवाहासाठी कपडे शिवण्यासही त्याने नकार दिल्याचे समोर आले आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या मोबाईल फोनमुळे सागरची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. सध्या कासा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागरचा मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी माहिती दिली.



