अतुल पुरी मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी मुंबईतून अटक

बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 22 ऑगस्ट 2025 रोजी तडाखेबंद हत्याकांड घडले होते. तिलक नगर रोडवरून बारीपुरा मार्गे बडनेरा स्टेशनकडे जात असताना 30 वर्षीय अतुल ज्ञानदेव पुरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी जिवघेणा प्राणघातक हल्ला केला. घटनास्थळी गंभीर जखमी झालेल्या अतुल पुरी यांचा मृत्यू झाला… आणि या प्रकरणी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
या प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आतापर्यंत 5 आरोपी आणि 3 विधी संघर्षीत बालकांना ताब्यात घेत प्रकरणाचा उलगडा केला होता. मात्र या हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी अक्षय प्रदीप शिंपी हा तब्बल तीन महिन्यांपासून फरार होता. गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या सतत मागावर होते. विविध ठिकाणी रेक्की, हालचालीचा तपास, गोपनीय माहिती गोळा करण्याचे काम मोठ्या दक्षतेने सुरू होते. आणि मग 22 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हे शाखेला एक महत्त्वाची माहिती मिळाली – फरार आरोपी अक्षय शिंपी मुंबईच्या चेंबूर परिसरात लपून बसल्याची खात्रीलायक माहिती बातमीदारांकडून मिळाली. यानंतर PI संदीप चव्हाण यांनी तातडीने सपोनी महेश इंगोले आणि त्यांचे पथक मुंबईकडे रवाना केले. मुंबईत चेंबूर परिसरात सापळा रचून पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी अक्षय शिंपीला ताब्यात घेतले. रविवारी आरोपीला पुढील तपासासाठी बडनेरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.



