23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – राज्यभरातील 4 लाख 75 हजारांहून अधिक उमेदवार प्रविष्ठ

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 चे आयोजन 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये 1,423 परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे. परीक्षेबाबतची सर्व कार्यवाही व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
उमेदवारांचा तपशील
- पेपर 1: 2,03,334 उमेदवार
- पेपर 2: 2,72,335 उमेदवार
- एकूण: 4,75,669 परीक्षार्थी
पेपर 1 साठी 571 तर पेपर 2 साठी 852 परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही प्रणालीद्वारे कडक पहारा ठेवण्यात आला असून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी व्यापक सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत.
यामध्ये मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी (फ्रिसकिंग) तसेच उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी बायोमेट्रिक व फेस रेकग्निशन सिस्टमचा वापर केला जाणार आहे.
केंद्रांवरील निगराणी
सर्व परीक्षा दालनांमध्ये, प्रवेशद्वारांवर आणि केंद्र संचालक कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असून ते जिल्हा आणि राज्यस्तरावरून लाईव्ह मॉनिटरिंगद्वारे सतत पाहणी केली जाणार आहे.
परीक्षा संचालन सुलभ आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी कनेक्ट व्यू प्रणालीद्वारे प्रत्येक केंद्र संचालक, नियंत्रण कक्ष आणि परीक्षा परिषद यांच्यात हॉटलाईन संपर्क व्यवस्था उपलब्ध असेल. दिवसभर आवश्यक सूचना प्रसारित करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. सर्व सूचना व संभाषणाचे रेकॉर्ड देखील जतन केले जाणार आहे, ज्यामुळे परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित होणार आहे.
उमेदवारांना आवाहन
परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी यूट्यूब चॅनल्स, सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत सूचना फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत
- www.mscepune.in
- mahatet.in
या संकेतस्थळांवर वेळोवेळी देण्यात येत असल्याने त्याच माहितीचा आधार घ्यावा, असे आवाहन परिषदेतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.



