मनपा अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याचा वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मृत्यू – शहरात संतापाची लाट

अमरावती महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक घटना बडनेरा झोनमध्ये घडली आहे. फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश वासुदेव मोहन (वय 45) यांनी 20 नोव्हेंबर रोजी कीटकनाशक औषध प्राशन केले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने विभागातील दडपशाही आणि अंतर्गत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होणाऱ्या मानसिक छळ, अन्यायकारक कामाचा भार आणि अवांछित वागणूक यामुळे राजेश मोहन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. अखेरीस 20 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांनी कीटकनाशक औषध प्राशन केले. तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, नागरिक आणि सामाजिक संघटना मोठ्या संख्येने रुग्णालयात धावून आल्या. शिवविच्छेदन कार्यालयासमोर आक्रोश उसळला. मृत्यूला वरिष्ठ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला.
यानंतर भीम ब्रिगेडने इर्विन चौक परिसरात चक्काजाम आंदोलन करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली. आंदोलनकर्त्यांचा स्पष्ट इशारा –
- दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करा
- अटक करा
- न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
या घटनेमुळे मनपा अग्निशमन विभागातील दडपशाही, कर्मचाऱ्यांचा असंतोष आणि कार्यपद्धतीतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
राजेश मोहन यांच्या मृत्यूला जबाबदार कोण आणि या प्रकरणात मनपा प्रशासन आणि पोलिस कोणती कारवाई करणार — याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



