बांधकाम कामगारांची नोंदणी पूर्णपणे मोफत; दलालांपासून सावध राहा – कामगार विभाग

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पूर्णपणे मोफत उपलब्ध असून ही प्रक्रिया mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन केली जाते, अशी माहिती कामगार उप आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
नोंदणीसाठी पात्रता
मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेल्या व्यक्ती नोंदणीस पात्र आहेत. अस्थायी किंवा अनियमित काम करणाऱ्यांसाठी ग्रामसेवक किंवा नगरपरिषद/महानगरपालिकेकडून 10 दिवसांचे कामाचे प्रमाणपत्र मिळू शकते.
मध्यस्थांकडून पैसे मागण्याचे प्रकार वाढले
कामगारांकडून नोंदणी किंवा लाभ मिळवून देण्यासाठी काही मध्यस्थ पैसे मागत आहेत, अशी तक्रार विभागाच्या निदर्शनास आली आहे. याबाबत विभागाने स्पष्ट केले आहे की:
- कार्यालयाचा कोणत्याही दलालांशी संबंध नाही
- नोंदणी आणि लाभ प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे
- अतिरिक्त शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे
पैसे मागितल्यास त्वरित तक्रार करा
जर कोणतीही व्यक्ती, अधिकारी किंवा कर्मचारी पैशांची मागणी करत असेल तर कामगारांनी:
- जवळच्या पोलीस ठाण्यात
किंवा - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियोक्त्यांनीही नोंदणी करावी
कामगारांनी mahabocw.in वर नोंदणी व नूतनीकरण करावे, तसेच मालक आणि ठेकेदारांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर नोंदणी करून कामगारांना नियोक्ता प्रमाणपत्र द्यावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त, अमरावती यांनी केले आहे.



