नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीवर पाचपावली पोलिसांची धडक कारवाई – ₹66 हजारांचा मुद्देमाल जप्त

पाचपावली पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीवर लगाम लावला आहे. पर्यावरण विभागाच्या कठोर बंदीनंतरही नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आझाद बुनकर कॉलनीतील एका गॅरेजवर छापा टाकत तब्बल ₹66,000 किमतीचा घातक मांजा जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचपावली पोलीस ठाण्याचे हवा सुषिल रेवतकर यांना पेट्रोलिंगदरम्यान अवैध विक्रीची माहिती मिळाली. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी पथकाने आझाद बुनकर कॉलनीतील सालीम गॅरेज अँड कार वॉशिंग सेंटर येथे अचानक छापा टाकला. तपासात आरोपी मो. सालीम अंसारी (वय 22) हा नायलॉन मांजाची अवैध विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून दोन प्रकारचा मोठा मुद्देमाल जप्त केला –
- 30 चक्री नायलॉन मांजा (TUN TUN ब्रँड)
- 30 चक्री नायलॉन मांजा (MONO KITE HERO PLUS)
जप्त मालाची एकूण किंमत सुमारे ₹66,000 इतकी आहे.
नायलॉन मांजा वापरामुळे पक्ष्यांचे मृत्यू, मानवी दुखापती व अपघात वाढत असल्याने शासनाने त्याच्या खरेदी-विक्री आणि साठवणुकीवर कठोर बंदी घातली आहे. तरीही आरोपीने नियम मोडून अवैधपणे व्यवसाय सुरू ठेवला होता.
पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर कलम 223 भा.दं.वि. सह कलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी तौकीर अंसारी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.



