धारणी उप-जिल्हा रुग्णालयातील माता-बालक मृत्यू प्रकरणावर आरोग्य विभागाचा खुलासा

धारणी उप-जिल्हा रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या माता आणि बालकांच्या मृत्यूंच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभागाने तात्काळ प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे. या चौकशीमध्ये भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य सेवेत असलेल्या त्रुटी आणि सुधारणा करण्याच्या आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
पहिल्या घटनेचे तपशील
प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे उपकेंद्र वारा तांडा हद्दीतील 20 वर्षीय नर्मदा नारायण चिलावे यांना 15 नोव्हेंबर रोजी पोटदुखीच्या तक्रारीमुळे धारणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत सर्व निष्कर्ष सामान्य होते.
कळा कमी असल्याने त्यांना काही वेळ प्रसूती कक्षात फिरण्यास सांगण्यात आले. नंतर सलाईन लावत प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू असताना रुग्णाला अचानक झटके येऊ लागले, डोळे पांढरे झाले आणि तोंडातून फेस येऊ लागला. सायंकाळी 6:45 ते 7 वाजता दरम्यान प्रसूतीपूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच प्रकृती गंभीर झाल्याने ही घटना घडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
दुसऱ्या घटनेचे तपशील
सादरावाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भोकऱवर्डी उपकेंद्रातील 25 वर्षीय कविता श्रीराम धोंडे यांना 13 नोव्हेंबर रोजी प्रसूती वेदना सुरू झाल्याने रुग्णालयात आणले जात असताना रुग्णालयाच्या आवारातच प्रसूती झाली.
त्यांना 2.5 किग्रॅ आणि 2.1 किग्रॅ वजनाची जुळी बाळे झाली. दोन्ही बालकांना एस.एन.सी.यु. मध्ये भरती करण्यात आले. मात्र 15 नोव्हेंबर रोजी एका बाळाचा मृत्यू दूध फुफ्फुसात जावून श्वसन थांबल्यामुळे झाल्याचे आढळले.
पहिल्या बालकाच्या मृत्यूनंतर आई आणि दुसऱ्या बालकाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नंतर रुग्णवाहिकेद्वारे घरी जात असताना दुसऱ्या बालकाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना समजले. चौकशीत रक्तातील साखर आणि तापमान कमी होणे ही मृत्यूची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट झाले.
आरोग्य विभागाने सांगितले की, दोन्ही घटनांची चौकशी पूर्ण झाली असून आवश्यक सुधारणा सुरू आहेत.



