जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय आर्चरी खेळाडू यशदीप भोगे याचा सत्कार

ढाका (बांगलादेश) येथे झालेल्या एशियन आर्चरी चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील खेळाडू यशदीप भोगे यांनी वैयक्तिक प्रकारात शानदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला आमदार सुलभा खोडके, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, विनोद पिदुरकर, उपअभियंता एन. प्रकाश रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, पोलिस निरीक्षक आनंद पिदूरकर, गटशिक्षणाधिकारी श्री. मोहने आदी मान्यवर उपस्थित होते.
जागतिक क्रमवारीतील दिग्गजाशी थरारक सामना
एशियन आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये यशदीपने क्वालिफिकेशन राऊंडमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कोरियाच्या खेळाडूसोबत सामना केला. त्यात 720 पैकी 687 गुण मिळवत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर यशदीपची वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून क्रीडा सुविधांच्या उन्नतीवर भर
यावेळी जिल्हाधिकारी येरेकर आणि आमदार खोडके यांनी सांगितले की –
- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि साहित्य खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे
- अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली युवा प्रतिभा घडवावी
- इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून यशस्वी खेळाडूंचा सार्वजनिक सत्कार करण्यावर भर द्यावा
क्रीडा संकुलातील प्रगतीचे परीक्षण
या बैठकीत क्रीडा संकुलात उभ्या राहणाऱ्या वसतिगृहाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
- वसतिगृहामुळे 40 विद्यार्थी – विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार
- इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून पुढे स्केटिंग मैदानासाठी निधी मागणी करण्याची सूचना
- क्रीडा संकुलातील विजेसाठी सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव
तसेच तालुका क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन अधिक सशक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, नव्या व्यवस्थापन समितीत खेळाडूंचा विशेषतः धनुर्विद्या (Archery) खेळाडूंचा समावेश केल्यास त्याचा थेट लाभ क्रीडा विकासाला मिळेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शालेय आणि शासकीय क्रीडा स्पर्धा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही यावेळी देण्यात आली.



