चिखलदरा निवडणुकीत रवी राणा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल – “काँग्रेसला स्वतःच्या नेत्यांचीही ओळख नाही”

चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधत राणा म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनाच त्यांच्या पक्षप्रमुखाचा परिचय नाही. चिखलदऱ्याची भौगोलिक, सामाजिक आणि स्थानिक गरजांविषयी सपकाळ यांना काहीच माहिती नसल्याचा आरोप त्यांनी केला.
रवी राणा यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चिखलदऱ्यात सुरू असलेला विकास आणखी पुढे नेण्यासाठी काँग्रेसच्या काही उमेदवारांनी चर्चा करून भाजपाचे उमेदवार अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या जवळपास नऊ ते दहा उमेदवार चिखलदऱ्यात नसून निवडणुकीनंतरच ते हजर होतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
यावेळी काँग्रेसच्या उमेदवारांवरही त्यांनी टीका केली. काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास कोणी तयार नाही आणि जे उभे आहेत त्यांनाही आम्ही सन्मानपूर्वक भाजपमध्ये घेत आहोत, असे राणा म्हणाले. यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, “चिखलदऱ्यात दिवा लावण्याचे कामही त्यांनी केले नाही.”
काँग्रेसकडून पैसा देणे, उमेदवार खरेदी यांसारख्या आरोपांना फेटाळत राणा म्हणाले की, भाजप हा मोठा पक्ष आहे आणि कोणीही कुणाच्या “खुट्याला बांधण्याची” गरज नाही. काँग्रेसचे उमेदवार भाजपाला लोकशाही मार्गाने सरेंडर करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी जुन्या प्रकरणाची आठवण करून देताना म्हटले की, “हनुमान चालीसा म्हटल्यावर आमचे 14 दिवस तुरुंगात झाले होते.” काँग्रेसमध्ये गोंधळ, नेतृत्व सक्षम नसल्याचे आरोप करत राणा यांनी सपकाळ आणि यादव यांनी आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.



