गोंदिया जिल्ह्यात धक्कादायक घटना – पंधरा वर्षीय मुलीवर जन्मदात्या बापाचे अत्याचार; गर्भधारणेचा उघड झाला धक्कादायक खुलासा

गोंदिया जिल्ह्यात मानवीयतेला काळिमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पंधरा वर्षीय मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती झाल्याचे रुग्णालयात तपासणीदरम्यान धक्कादायक निष्पन्न झाले. या विकृत आणि संतापजनक घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
आई माहेरी, बाप आणि मुलगी घरात एकटे
सडक अर्जुनी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या या कुटुंबात मुलीची आई, पतीच्या वाईट वागण्याला कंटाळून तब्बल दहा वर्षांपासून माहेरी राहत होती. घरात मुलगी, तिचा भाऊ आणि आरोपीची आई – हे तिघेच राहत होते. वयाने लहान असल्याने पीडित मुलगी बापासोबतच झोपत असे आणि याच संधीचा फायदा घेत आरोपी पिता अत्याचार करीत राहिला.
पोटदुखीची तक्रार… आणि धक्कादायक निष्कर्ष
मुलीला काही महिन्यांपासून सतत पोटात वेदना होत असल्याने तिला गोंदिया महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले आणि खऱ्या अत्याचाराचे भयावह सत्य बाहेर आले.
आरोपीला अटक
या प्रकरणी तात्काळ डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून त्याच्यावर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश वनारे व सहाय्यक निरीक्षक रुपाली पवार करीत आहेत.
सर्वत्र संताप – “अशा नराधमाला फाशीच द्या!”
जन्मदात्या बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर येताच नागरिक व सामाजिक संघटनांतून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. जिल्हाभरातून एकच मागणी जोर धरत आहे –
“अशा नराधमाला फाशीची कठोरात कठोर शिक्षा द्या!”



