अमरावतीच्या राजकारणात तुफान वाद–विवाद; रवी राणा विरुद्ध यशोमती ठाकूर आमने–सामने

अमरावतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. राणा यांनी दावा केला आहे की माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर पुढील सहा महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश करतील, आणि हा दावा “काळ्या दगडावरची पांढरी रेघ” असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर राणा यांनी आणखी एक दावा करत म्हटले की, यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, त्या मतदारसंघातून राजेश वानखडे यांचे नाव अंतिम झाल्याने त्यांना तिकीट मिळू शकले नाही, असा आरोपही राणा यांनी केला. या वक्तव्यानंतर अमरावतीत राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली.
ठाकूरांचा जोरदार पलटवार
राणा यांच्या दाव्यानंतर काही वेळातच यशोमती ठाकूर यांनी कठोर प्रतिउत्तर देत राणा दाम्पत्यावर थेट निशाणा साधला.
“आमच्या भावाला जोग (जोक) मारायची आणि नाटक–नौटंकी करण्याची सवय आहे,” अशा शब्दांत त्यांनी राणा यांच्यावर टीका केली.
ठाकूर इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी भाजपवर आरोप करत म्हटले—
“भाजपने संपूर्ण अमरावतीचा पक्ष राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधला आहे. ही गुंडागिरी लोकांना अजिबात पसंत नाही.”
राणा यांनी केलेल्या “काळ्या दगडावरची पांढरी रेघ” या दाव्यावर ठाकूर यांनी पलटवार करत उत्तर दिले—
“मी म्हणते की पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे. भाजप वापरून झाल्यावर तुम्हाला फेकून देईल.”
राजकीय तापमानाची वाढ
राणा–ठाकूर यांच्यातील आरोप–प्रत्यारोपांमुळे अमरावतीपासून तिवसा पर्यंत राजकीय वातावरण तापले आहे. राणा यांच्या दाव्यामागे कितपत तथ्य आहे आणि ठाकूर यांच्या उत्तराला पुढे काय दिशा मिळते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
पुढील काही दिवसांत या राजकीय संघर्षाला कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.



