अग्निशमन दलातील फायरमनचा आत्महत्येचा धक्कादायक प्रकार – वरिष्ठांच्या मानसिक छळाला कंटाळून जीव संपवल्याचा आरोप

अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या राजेश वासुदेव मोहन (बडनेरा) यांनी सहकारी कर्मचारी व वरिष्ठांकडून होत असलेल्या कथित मानसिक अत्याचाराला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेने संपूर्ण अमरावती हादरून गेली आहे.
विष प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी रुग्णालयातच राजेश मोहन यांनी स्वतः केलेले व्हिडिओ स्टेटमेंट आता या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरत आहे.
व्हिडिओमध्ये धक्कादायक आरोप
विडिओ स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितले की, कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर त्यांना सतत मानसिक छळाचा सामना करावा लागत होता. त्यांनी तीन व्यक्तींना जबाबदार ठरवले आहे –
1. संतोष केंद्रे (रा. बीड)
2. राम शिंदे
3. लक्ष्मण पावळे
मृतकाच्या म्हणण्यानुसार, या तिघांनी सतत त्रास दिल्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
कुटुंबाचा आक्रोश – पोलिस स्टेशनमध्ये तणाव
घटनेनंतर मृतकाच्या परिवाराने बडनेरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी उपस्थिती लावली. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल असे सांगताच मृतकाच्या पत्नीचा आक्रोश पाहून वातावरण तणावपूर्ण झाले.
कुटुंबियांसह नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली –
“जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही.”
काही काळ तणाव वाढल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी तक्रार दाखल करून तपास सुरू झाल्याची माहिती दिली.
पोलिसांचा पुढील तपास
बडनेरा पोलिसांकडून सध्या या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सुरू असून मृत्यूचे कारण, जबाबदार व्यक्ती आणि मानसिक छळाच्या बाबींवर सखोल चौकशी केली जात आहे.
मृतकाच्या कुटुंबीयांनी राजेश यांच्या अकाली मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे.



