वसतिगृह खाली करण्यावरून वाद! ‘पर्यायी व्यवस्था द्या’, SRTMU मध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार आंदोलन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या नियोजनावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रीडा महोत्सवाच्या तयारीसाठी विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिल्याने विद्यार्थी संघटनांनी आज जोरदार आंदोलन केले.
वसतिगृह खाली करण्याचे आदेश, विद्यार्थ्यांमध्ये संताप
विद्यापीठात लवकरच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या नियोजन आणि निवास व्यवस्थेसाठी विद्यापीठाने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सव संपेपर्यंत वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिले आहेत.
या वसतिगृहांमध्ये अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
तसेच, अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने त्यांना बाहेर राहणे परवडणारे नाही.
यामुळे, विद्यार्थ्यांनी वसतिगृह खाली करण्यापूर्वी पर्यायी राहण्याची व्यवस्था विद्यापीठाने करावी, अशी मागणी केली.
विद्यापीठाच्या नकाराने विद्यार्थी आक्रमक
विद्यार्थ्यांनी केलेली पर्यायी व्यवस्थेची मागणी विद्यापीठाने मान्य करण्यास नकार दिल्याने विद्यार्थी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. या निषेधार्थ, आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जोरदार आंदोलन करून विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, विद्यापीठाने पर्यायी राहण्याची व्यवस्था केल्याशिवाय आम्ही वसतिगृह सोडणार नाही. या आंदोलनामुळे विद्यापीठाचे वातावरण काही काळ तणावाचे बनले होते. यावर विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



