दारूच्या नशेत युवतीकडून कारची धडक; पाच जखमी, नागरिक संतप्त

फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी (19 नोव्हेंबर) रात्री एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत कार चालवत असलेल्या एका युवतीने नियंत्रण सुटलेल्या कारने रस्त्यावर चालत असलेल्या पाच नागरिकांना चिरडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आक्रोशित झाले आणि संबंधित कारची तोडफोड केली. पोलिसांनी तात्काळ युवतीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
ही घटना मोतीनगर ते यशोदानगर मार्गावर रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. MH 34 K 5289 क्रमांकाची कार चालवत असलेल्या युवतीने अचानक वाहनावरील नियंत्रण गमावले. या अपघातात एका केळी विक्रेत्यासह एकूण पाच जण जखमी झाले असून एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
दारूच्या नशेत कार चालवली गेल्याचा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड करत आरोपीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवतीला ताब्यात घेतले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाहन चालवताना निष्काळजीपणा आणि मद्यपान यामुळे अपघात किती भीषण ठरू शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.



