अमरावतीत दहावीच्या विद्यार्थ्याकडून मुख्याध्यापकांवर चाकू हल्ला; शिक्षेचा राग अनावर

अमरावतीत एका 15 वर्षीय विद्यार्थ्याकडून शाळेच्या मुख्याध्यापकांवरच चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून, वर्गातील शिक्षेचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
न्यू स्वस्तिक नगर येथील विनोद शंकरराव तिरमारे (वय 56), हे प्रभू कॉलनीतील मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी इतिहासाच्या तासादरम्यान दहावीतील विद्यार्थी वृषभ देवानंद गुलाबे (वय 15, रा. महादेव खोरी) हा वर्गात बेशिस्त वर्तन करीत असल्याने मुख्याध्यापकांनी त्याला शिक्षा दिली.
शिक्षेनंतर विद्यार्थी वर्गाबाहेर गेला. मात्र काही मिनिटांनी — दुपारी सुमारे 1:15 वाजता — तो चाकूसह शाळेच्या ऑफिस रूममध्ये आला आणि कोणताही संवाद न करता मुख्याध्यापक तिरमारे यांच्या छातीच्या डाव्या बाजूस वार करून पळून गेला. यावेळी शाळेचे शिपाई बाबाराव खंडारे घटनास्थळी उपस्थित होते.
जखमी अवस्थेत मुख्याध्यापकांनी शिक्षक रविंद्र सौळके यांच्या मदतीने थेट फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्यावर संबंधित गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेने शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



