अजनीत निर्माणाधीन इमारत साइटवर जळलेल्या अवस्थेत मजुराचा मृतदेह; पोलिस तपास सुरू

नागपूरच्या अजनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निर्माणाधीन इमारत प्रकल्पावर जळालेल्या अवस्थेत एका मजुराचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच अजनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी सांगितले की, 20 नोव्हेंबर रोजी साइटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा मृतदेह दिसून आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण अपघात, आत्महत्या की काही वेगळे संशयास्पद कारण, याबाबत स्पष्टता मिळणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी साइटवरील कामगारांची चौकशी सुरू केली असून, सुरक्षा नोंदी आणि CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील बांधकाम ठिकाणांवरील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



